बाप
काहीतरी असतंच बापाबददल,
बोलायचं राहून गेलेलं...
आयुष्याच्या किनाऱ्यावर,
आठवण म्हणून वाहून आलेलं...
बोटाला धरुन चालायला शिकवणारा..
चुकल्यावर गालावर बोटं उमटवणारा...
खांद्यावर हात टाकून जत्रा फिरवणारा,
अन् रेवड्यांसोबत गोड गारेगार घेणारा...
समुद्रातल्या लाटेत नावा वर खाली होताना,
मनात भीतीची चलबिचल चालू असते...
तेव्हा बकोटीला धरुन शांत करणारा...
आयुष्यात नेहमी धीरोदात्त असणारा...
हेंदकळणाऱ्या जीवाला घट्ट उभं करणारा...
बापच् असतो तो...!
पडत्या पावसात चालणारा...
स्वत: भिजून मुलांवर छत्री धरणारा,
‘काही नाही झालं’ असं स्वत: आजारी
असल्यावर म्हणणारा,
मुलं आजारी झाल्यावर खिसे खाली करणारा,पळणारा....बापच् असतो तो!
बऱ्याचदा बोलायचं असतं...
पण भीती वाटत राहते...
आईला मिठी मारतो नेहमी,
बापाला मिठी मारताना घाई होते...
व्यक्त व्हायला जमत नाही बापासमोर,
वेळ सरकत नाही समोर...
न बोलताच हवा उडून जाते ओठांतून...
बोबडे शब्द हवेतच विरतात...
तो असतो जवळचा मित्र...
पण तरी आदरापोटी बोलणं जास्त खुलत नाही,
असतात एकाच कुंडीतले दोन अंकूर
पण कळ्या जास्त फुलत नाहीत!
त्यालाही बोलायचं असेल...
पण तो जास्त बोलत नाही,
त्याचा नजरेच्या एका कटाक्षात,
उच्चार समोरचा सूचत नाही...
कितीदा मनातलं समोर त्याच्या बोलतच् नाही,
बोलायचं म्हणून बोलायचं राहूनच जाई...
आठवणींचा अल्बम सुसाट सुरु होतो त्याच्यासह,
पानं उलगडायला वेळ आपण देतच नाही,
त्या पानांवरची धूळ झटकून टाकायला हवी,
बापासोबतची आपली मैत्री मिरवायला हवी..!
©सुदिप
सुजित दिगंबर पंडित
२४/०९/२५

Comments
Post a Comment