महाराष्ट्राची एकसष्टी

सह्याद्रीची मनमोहक निसर्गसृष्टी,

अंबोलीची धोधो पर्जन्यवृष्टी,

लोणारची उल्कापत्ती,

वेरुळची त्रिमिती,

मुंबईची सिएसएमटी!


महाराष्ट्राची एकसष्टी!

 

मला महाराष्ट्राचा नकाशा उभा-आडवा पाहिला की भारताचा नकाशाच वाटतो.अगदी तंतातंत बिलकुल नाही पण कन्याकुमारीचा द्विपकल्प जसा निमुळता आहे तसा तळकोकणात महाराष्ट्र आहे.मग आंध्रात एका वळणानंतर बंगालपर्यंत सरळ भूभाग/किनारपट्टी आहे,तसा भूभाग कोल्हापूर-सांगलीपासून यवतमाळपर्यंत आहे.

थोडं पलीकडे ईशान्यतल्या मिझोरमची तटबंदी आहे तसा गडचिरोलीचा देखील अभेद्य बुरुज आहे,पश्चिमेकडे भारताची अन् राज्याची सीमा अरबी समुद्रास एकत्रित भेटते.वायव्येला राजस्थानचे जैसलमेरचा आकार जसा आहे तत्सम आकार आपल्या नंदूरबारचा मला वाटतो.

एका देशातल्या एका राज्याचं त्याच्या देशाच्या राज्यासोबत असं मिळतं जुळतं असणं माझ्यासारख्या नकाशावेड्या इसमाला जरा जास्तचं आकर्षण!

ते सौंदर्य पण अभिमानासोबत आनंद देऊन जाते.


भूभागावर रेषेचे ओरखडे ओढले की बनते भौगोलिक सीमा.मग तिथून सुरु होतो त्या प्रांताचा,प्रदेशाचा,भूभागाचा,अन् सरतेशेवटी तिथल्या लोकांचा एक स्वतंत्र प्रवास.

एकाच देशाच्या आधिपत्याखाली राहून,संविधानिक संघराज्य प्रणालीची अंमलबजावणी करत,लोकशाहीचे विकेंद्रीकरण करत एक राज्य स्वत:चं अस्तित्व उभं करते आणि देशात अग्रेसर सरते.इतरांना दिशादर्शक ठरते अशा या बाहेरुन कणखर अन् आतून नाजूक देशाची गोष्ट,त्याच्या एकसष्टीची गोष्ट.



जगातल्या देशांचे क्षेत्रफळ-लोकसंख्या विचारात घेतले तर महाराष्ट्र युरोप,आशियातल्या कित्येक देशांच्याही पुढे आहे.अर्थव्यवस्थेत सुरुवातीपासूनच राज्य अव्वल आहे आणि अशीच प्रगती करत राहील असा विश्वासही वाटतो.


भारतात ३८ जागतिक वारसा स्थळे आहेत पैकी सर्वाधिक  महाराष्ट्रात आहेत,देशात सर्वात प्रथम राज्य फुलपाखरुचा दर्जा देणारे राज्य देखिल महाराष्ट्रच ठरले होते.निसर्गाने समृध्द राज्य खनिजांमध्ये देखिल संपन्न आहे.


७२० किमीचा समुद्रकिनारा,जलदुर्गांचे देखणे प्रवेशद्वार पश्चिमेकडे तर पूर्वेकडे इंद्रावती नदी छत्तीसगडसोबत राज्याची सीमा विभागते.उत्तरेला तापी -नर्मदा खचदरीतून वाहत अरबी समुद्राला मिळतात तर दक्षिणेला वाहत जावून कृष्णा गोदावरी बंगालच्या उपसागरात प्रचंड मोठे त्रिभूज प्रदेश बनवतात.


एखाद्या कुटुंबाचा एक वडिलधारा माणूस असतो ज्यापुढे सर्व नतमस्तक होतात,महाराष्ट्रात ३९० वर्षापूर्वीचा जिजाऊ-शहाजीराजेंचा शिवबा अखंड शौर्याचा,उर्जेचा,त्यागाचा अन् लढाऊ बाण्याचा अखंड आणि सदोदित स्त्रोत्र आहे.वारकरी संप्रदायाची शिकवण अन् डफावरचे पोवाडे उरात ठेवून महाराष्ट्रीयांची छाती अभिमानाने भरुन येते.

अन् ओठातून आपोआपच ‘जयजय महाराष्ट्र माझा’ हे अभिमानगीत गायले जाते.


मालवणी-कोकणी पासून भाषा कोल्हापूरी-सातारी रांगडी बनते तर शेजारी जरा तूपात सदाशिवपेठी फोडणी तिला दिली जाते,नगरी जर्दा जसा कडक किक मारतो तशी तिथली भाषा राकट वाटते.मराठवाड्यातला पोत ऐकावासा वाटतो तर नाशिकातली पाड्यांवरची भाषा मनात घर करुन राहते.बहिणाबाईंची अहिराणी ऐकाविशी वाटत राहते,संस्कृतीच्या पाऊलखुणा जपत राहते अन् विदर्भातली मराठी सावजीच्या झणझणीत रश्श्यासारखी वाटते.


असा हा वैविध्यपूर्ण महाराष्ट्र,माझा-तुमचा आपल्या सर्वांचा महाराष्ट्र आज एकसष्टीत प्रवेश करताना ‘मंगलकलशा पासून सुरु झालेला प्रवास आरोग्यदायी  लसीकरणासह चालू ठेवतोय’.

त्याच्या वाढदिनी शुभेच्छा तर आहेतच अन् सोबत देशाला,जगाला संकटातून बाहेर काढण्याचं बळ सुध्दा त्याला मिळो या सदिच्छादेखिल!


जय हिंद जय महाराष्ट्र!❤️


©सुजित




Comments

  1. खुप सुंदर लिहिले आहे...‌ 👍👌👌👌जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडून पडलीय फ्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

विठ्ठल