बाईंडिंग
सहज कपाटात पुस्तके बघत होतो,खाली असलेल्या जून्या वहीकडे लक्ष गेलं,माझ्या शालेय जीवनातली असावी म्हणून मी नकळत चाळू लागलो.लहानपणापासून आपला आनंद आपल्याही नकळत कशात सामावला असेल तर तो म्हणजे नव्या-जून्या पुस्तक-वह्या उघडल्यावर डोळे बंद करून त्याचा वास घेण्यामध्ये ! अर्थात वयं वाढतं म्हणून त्यातला आनंद कमी होत नाही,उलट अश्या बाल आठवणींनी तो दुणावतो.
कडक पुठ्ठ्यावर नक्षी असलेली ती “बाईंडिंग” केलेली वही माझ्या ‘शाळा’ या ऐतिहासिक काळातली होती.शाळा ही गोष्टच् मूळात ऐतिहासिक असते,नंतर कधीतरी तिच्याबद्दल लिहिन.तर पुन्हा “तिच्याकडे” वळतो,किंबहूना तिला उलगडण्याचा प्रयत्न करतो...
पहिल्या पानावर आमचंच नाव दिमाखदार शैलीमध्ये लिहिलं होतं,अक्षर लय देखणं नसले तरी स्वत:ला आवडेल एवढं बरं होतं.कोणत्यातरी महान व्यक्तींचा “विचार” तिकडंच गिरवलेला होता,बर वाटलं वाचून.एकएक पान उलगडत पुढे सरकत होतो अन् मन आठवणींसोबत किंचितश्या जास्त वेगाने मागे सुसाट धावत होतं.एकाच वहीमध्ये अनेक भाग केलेले होते,पानं दुमडून.मध्येच मोराचा एक रंगबेरंगी पंख सापडला जणू शाळेच्या त्या रंगीत आठवणींचा प्रतिक बनून.नंतर गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या अलगद हवेत उडाल्या,आता कोणी दिल्या होत्या हे विचारु नका😂😂 आम्हीच ठेवल्या होत्या.(कारण पण आमचीच ऐतिहासिक शाळा!)
काही ठिकाणी “एक्स्ट्रा पिरिएडला”केलेले आमचे उद्योग आमच्या कर्तृत्वाची साक्ष देत होते,’ठिपक्यांतली कोडी,नावांचे वेगवेगळे फाॅंट्स,उद्याचा गृहपाठ असले रकाने’ इत्यादी इत्यादी ,अर्थात खूप जास्त गृहपाठ न लिहिता एक छडी खाण्यात जास्त शहाणपणा असतो अस थोर संतांनी म्हणलं होतंच,’छडी लागे छमछम,विद्या येई घमघम’(हे मला त्या काळात कळल होतं यातच् मला जास्त आनंद होता).इथं विद्या= बुद्धी असा अर्थ घ्यावा. बाकी आपण कधी माॅनिटर नव्हतो त्यामुळं बाकीच्या पोरांची नावं आपल्या वहीत पण नव्हती,हा पण त्यांच्या वहीत आपली नावं नेहमी असायची,रेग्युलर प्रसाद पण मिळायचा. ‘ए पोराऽऽऽ ,टायगर आणि बक्कळ मार!’बद्दल नंतर लिहिन...
दोनेक तासांत वही संपत आली,शेवटच्या बेंचवर बसून मास्तर लोकांचे चित्र पण रेखाटले होते,अर्थात त्यांच्यावरच्या प्रेमापोटीच ! 🙈☺️बाकी तेव्हाचे मार्क्स वगैरे वगैरे सगळं मोहमाया असते,(आत्ताच्या मार्क्सवादाचा त्या मार्क्सशी काहीही संबंध नाही!)रटाळपणे घटक चाचण्या होत असतात,त्यामुळ मित्रांच्यात आपुलकी वाढते हे मात्र विशेष. (का ? ते अनुभवायचं असते!☺️)
ती ‘बाईंडिंगची’ वही,टाकाऊपासून टिकाऊ असं ‘मूलभूत’ संदेश देणारी(आत्ता आपण वाचतो ते Reduce-Recycle-Reuse या तत्वज्ञानाची जननी.)जून्या वह्या पुन्हा व्यवस्थित करुन वापरात यायच्या,परिणामी वृक्षतोड झाली नाही याचा मनांत खोल आनंद असायचा.यातच पुढं ‘Material Management’ हे व्यावसायीक धडे आपोआप मिळायचे (without MBA).
आज केवळ तीच् नाही भेटली,तिच्यासोबत घालवलेले ‘ते सोनेरी’क्षण थेट समोरच् उभे राहिले.शाळेत असताना कोणीच सोनेरी म्हणत नसतं,कारण तेव्हा ‘मार्च रश’ सारखा शाळा कधी संपेल हा ध्यास लागलेला असतो,किमान माझ्यासारख्या दांडी बहाद्दर अन् बाहेरच्या वर्गात रमणाऱ्यांसाठी.पण आज या ‘बाईंडिंग’ मध्ये जून्या आठवणी किती घट्ट बांधून ठेवलेल्या होत्या,त्या सापडल्या! तुमच्याकडे पण असेलच की अशी बाईंडिंगची वही किंवा अश्या आठवणी,बघा बघा त्यावरची धूळ पुसून त्या वाचत चला,हसू नक्की येईल,हसत चला,आज त्याची जास्त गरज आहे टेन्शन फ्री राहण्याकरता.तुम्हाला ‘तुम्ही आणि तुमचे पराक्रम’ आठवतील. नाहीतरी मोबाईलवर आपण दुनियेशी बोलतोच की, स्वत:शी पण बोलत चला,अजून एक विश्वासू मित्र नक्की सापडेल.
बाईंडिंगची वही होती तिकडं गेली पण तिचे आठवणींचे कोंदन माझ्या काळजावर कोरले गेले,अगदी ‘ठळ्ळक’ अक्षरात!
खूप छान सुजित.
ReplyDeleteवाचता वाचता मला माझे शाळेचे दिवस जसेच्या तसे डोळ्यासमोर आले. इतका छान वर्णन केलंस की, लिहिलंयस तू, पण मी स्वतःला अनुभवलं या लेखात.☺☺
Aathvaninchya Hindolyavar 👌👌👌 sunder lihla ahe 😊
ReplyDelete