पाऊस

कधी अवतरतो घेऊनि इंद्रधनुचे रंग..
कधी दरवळतो हलकासा मृदगंध..
ओल्या तुझ्या मिठीत अंग..
बरसतो तू कधी बेधुंद..कधी चिंब चिंब..

ओढ तुझी लहान थोरास,
पशू असो वा मानवास,
कधी भेगाळलेल्या भूईस..
वा चातकाच्या घशास.

कोसळतो तू कधी मोतेरी हिरा,
कधी गारठलेल्या अल्लड गारा..
सह्यपासून हिमाद्रीपर्यंत..
तू  असतोस जिने इक सहारा.

तू आढळतो वेधशाळेच्या गणितात,
किंवा शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या हिशेबात..
शेतकऱ्यांच्या पेरणीच्या स्वप्नात,
अन कधी अविश्वासी दुष्काळात.

तू दौडतो कालिदासाच्या महाकाव्यात,
वा ग्रेसांच्या शुभ्र निखळ झऱ्यात...
चंचल तू,अभेद्य तू,अविरत धावतोस तू,
अन लुप्त होतो अथांग खारट सागरात

पाऊस तू..वर्षाव तू..
वरुण तू..वसुंधरेचा प्रियकर तू..
मनात तू...रानात तू..
भेटीस ये- लवकर तू...मखमली वनात तू...

© सुजित पंडित

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडून पडलीय फ्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

विठ्ठल